Congress President: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज हाती घेतली. यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी खर्गेंनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि एक मोठी घोषणाही केली. काँग्रेस नेत्यांना उद्देशून खर्गे म्हणाले की, एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. सोनिया गांधींनी पक्षाची धुरा चोखपणे सांभाळली, मीही मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करेन.
सोनिया गांधी यांनी अभिनंदन केलेखर्गे यांचे अभिनंदन करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, "मी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करते. सर्वात समाधानाची बाब म्हणजे अध्यक्षपदी निवडून आलेले खर्गे अनुभवी नेते आहेत. त्यांना पक्षाबद्दल अतिशय तळमळ आहे. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन ही उंची गाठली आहे."
अनेक दिग्गजांनी खर्गेंचे अभिनंदन केले
काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील म्हणाले, "खर्गे जी यांची धोरणे ही पंडित जवाहरलाल नेहरूंची धोरणे असतील. आपल्याला लोकशाही आणि समाजवाद मजबूत करायचा आहे, जातिव्यवस्था संपवायची आहे. त्यात काही नवीन धोरणांचाही समावेश असू शकतो." त्याच वेळी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, " सोनियाजींनी घेतलेला निर्णय यशस्वी करून पक्ष मजबूत करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे."