VIDEO: "मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस..."; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:15 IST2025-02-04T17:06:52+5:302025-02-04T17:15:59+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप खासदाराला फटकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

VIDEO: "मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस..."; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं
Mallikarjun Kharge: अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. महाकुंभात मृत्यू पावलेल्या लोकांना काँग्रेस अध्यक्षांनी श्रद्धांजली वाहिली. महाकुंभात हजारो लोकांनी बलिदान दिले आहे, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी खळबळ उडवून दिली होती. यावरून घरात बराच गदारोळ झाला. त्यानंतर आता खरगे यांनी यांनी भाजप खासदाराला वडिलांचा उल्लेख करत सुनावलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप खासदाराला फटकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या भाषणादरम्यान चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा आणि भाजप खासदार नीरज शेखर यांच्याशी त्यांचा जोरदार वाद झाला. नीरज शेखर यांच्या वडिलांचा उल्लेख करत मल्लिकार्जून खरगे यांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावर मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. यादरम्यान भाजप खासदार नीरज शेखर यांनी मध्ये बोलण्यास सुरुवात केली. यावर मल्लिकार्जुन खरगे अचानक संतापले आणि त्यांनी आपले बोलणे थांबवले आणि आपला राग व्यक्त केला.
"तेरे बाप का भी मैं ऐसे ही साथी था. उसे लेकर घूमा. तू क्या बात करता है. तुझको देख एक मिनट. चुप, चुप, चुप बैठ... चुप बैठ," असं म्हणत खरगे यांनी हाताने इशारा करून लगेच नीरज शेखर यांना बसण्यास सांगितले. भाषणात व्यत्यय आल्याने संतप्त झालेल्या खरगे म्हणाले की, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा आपण खूप आदर करतो. चंद्रशेखर हे ज्येष्ठ नेते होते, मी चंद्रशेखर यांच्यासोबत होतो आणि मला अटकही झाली आहे.
Kharge Sahab 🔥 pic.twitter.com/8QSlH05pi1
— Srinivas BV (@srinivasiyc) February 3, 2025
दरम्यान, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा वारसा सांभाळणाऱ्या नीरज शेखर सिंह यांनी समाजवादी पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००७ मध्ये राजकारणात प्रवेश केल्यापासून नीरज शेखर हे खासदार आहेत. ते कधी लोकसभेचे तर कधी राज्यसभेचे खासदार होते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.