Manipur Violence: गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर धुमसत आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली होती. परंतु, पुन्हा एकदा मणिपूरमधील परिस्थिती चिघळत असल्याचे सांगितले जात आहे. यातच राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. १४७ दिवस झाले. मात्र, अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला.
मणिपूर सरकारने अधिसूचना काढत सांगितले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस स्टेशन्स वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण मणिपूरमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. १९ पोलीस स्थानकांचे हद्दी परिसर वळगून अन्य भाग अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.
PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही
मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, यात मणिपूरमधील परिस्थितीवरून केंद्र सरकावर टीका केली आहे. गेल्या १४७ दिवसांपासून मणिपूर धुमसत आहे. पण पंतप्रधान मोदींना राज्याचा दौरा करायला वेळ नाही. या हिंसाचारात विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भातील जे फोटो समोर येत आहेत, त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. महिला आणि मुलांना हिंसाचारासाठीचे हत्यार बनवले जात असल्याची बाब आता उघड होत आहे. सुंदर राज्य असलेले मणिपूर रणांगण बनले आहे. हे सर्व भाजपमुळे घडत आहे. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करायला हवी. पुढील कोणत्याही गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पहिले पाऊल असेल, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इम्फाल शहर आणि घाटी परिसरातील भागात विद्यार्थी हिंसक निदर्शने करत आहेत. सुदैवाने आताच्या घडीला तरी हिंसाचाराच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु मणिपूरमध्ये अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे.