काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. '2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ही सार्वत्रिक निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा सरकार स्थापन केल्यास ते हुकूमशाहीत उतरतील, असा दावा खरगे यांनी केला. 2024 मध्ये देशातील जनता शेवटच्या वेळी निवडणुकीत सहभागी होईल, असंही खरगे म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सत्तेवर आले तर हुकूमशाही येईल, भारतात यापुढे लोकशाही राहणार नाही आणि इथे निवडणुका होणार नाहीत. ते प्रत्येकाला ईडी नोटीस देत आहेत. ते लोकांना घाबरवत आहेत. भीतीमुळे काही लोक मैत्री सोडत आहेत, काही पक्ष सोडत आहेत आणि काही युती सोडत आहेत. मतदान करण्याची ही शेवटची संधी आहे. यानंतर मतदान होणार नाही, अशी भीतीही खरगे यांनी व्यक्त केली.
"राहुल गांधींना देश एकसंघ करायचा आहे, त्यांनी प्रेमाचे दुकान उघडले आहे. पण भाजप आणि आरएसएसने द्वेषाचे दुकान उघडले आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. भाजप आणि आरएसएस विष आहेत, ते आम्हाला आमचे हक्क हिरावून घेत आहेत,असा आरोपही खरगे यांनी केला.