मल्लिकार्जुन खरगे होणार ‘इंडिया’चे अध्यक्ष; संयोजकपदी कोण? नाव ठरेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 06:03 AM2024-01-14T06:03:05+5:302024-01-14T06:04:51+5:30
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यांच्या नावावर सर्व नेत्यांची सहमती झाल्याचे समजते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयोजकपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली असली, तरी ‘इंडिया’तील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची शनिवारी आभासी बैठक पार पडली. त्यात खरगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दुसरीकडे आघाडीत उत्तर व दक्षिण भारताच्या प्रतिनिधित्वाचे संतुलन साधण्यासाठी संयोजक म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव आला, पण आपल्याला पदाची लालसा नसल्याचे सांगून नितीशकुमार यांनी ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांना संयोजकपद देण्याची सूचना केली.
बैठकीला अनुपस्थित नेत्यांसह आघाडीतील सर्व नेत्यांशी पुन्हा चर्चा करून लवकरच सर्वसंमतीने नितीशकुमार यांची निवड करण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नितीशकुमार यांनी संयोजकपद स्वीकारण्यास फारसे स्वारस्य दाखवले नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
खरगे-केजरीवाल भेट
‘इंडिया’ची बैठक संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
यावेळी राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि राघव चढ्ढा उपस्थित होते. केजरीवाल यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि ‘आप’च्या नेत्यांची जागा वाटपाच्या मुद्यावर दुसरी आणि महत्त्वाची बैठक झाली होती. या भेटींमुळे काँग्रेस व आपमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.
बैठकीत जागा वाटपाच्या मुद्दयावर सकारात्मक चर्चा झाली. ‘भारत जोडो न्याय यात्रे’त ‘इंडिया’च्या नेत्यांनी सहभागी व्हावे.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
देशाला पर्याय देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस