बंगळुरू - कर्नाटकच्या निवडणूक प्रचारावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी माझ्या विधानावरून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी साप आहेत असं खरगेंनी म्हटलं होते.
वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील. वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला असेल आणि कुणाला दु:ख झाले असेल तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात. आरएसएस-भाजपा यांची विचारधारा विषारी आहे. परंतु भाजपाची तुलना पंतप्रधान मोदींची केली असं ते म्हणाले.
तसेच कुठल्याही व्यक्तीबाबत आणि कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसबाबतीत काही बोललो नाही. माझे विचार त्यांच्या विचारधारेहून वेगळे आहेत. कुणावरही वैयक्तिक हल्ला केला नाही. भाजपाची विचारधारा विभाजनवादी, द्वेषपूर्ण, गरीब आणि दलितांप्रती पूर्वग्रहदुषित आहे. मी या विचारधारेवर टीका केली. माझे विधान वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हते असं स्पष्टीकरण खरगेंनी दिले आहे.
'प्रतिस्पर्ध्यांसाठीही शिष्टाई निभावलीय''पंतप्रधान मोदींसोबत आमची लढाई वैयक्तिक लढाई नाही. ही वैचारिक लढाई आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा तो आचारही नाही. मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते करेन असंही खरगेंनी लिहिलं आहे.
भाजपाची टीकाकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खरगेंचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे.