- आदेश रावल/सुरेश एस. डुग्गर
नवी दिल्ली : पाच वर्षानंतर जम्मू- काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारपासून जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सामंजस्याबाबत चर्चा होणार आहे.
तसे तर दिल्ली हायकमांडला तडजोड करायची आहे, परंतु जम्मू- काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचा त्याला विरोध आहे. पण आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या नेतृत्वात थेट चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीला मिळालेले यश पाहता, विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांना भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र ठेवायचे आहे. विधानसभा निवडणुकीतील युतीच्या रणनीतीबाबतही ते बोलणार आहेत.
पक्षांतराचे वारे जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर या भागातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर निष्क्रिय झालेले अनेक राजकीय नेते आता नव्या पक्षांमध्ये सामील होत आहेत. ताज्या घडामोडीत अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीर अपना पार्टीचे संस्थापक सदस्य जफर इक्बाल मन्हास यांनी राजीनामा दिला असून ते मुलासह काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे.