हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे राज्यसभेत स्वागत केले. या वेळी विरोधकांनी, आपल्याकडेही लक्ष असू द्यावे, असे आवाहन त्यांना केले. राज्यसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे उपराष्ट्रपतींचे स्वागत करताना म्हणाले, मला आशा आहे की आपण आमच्या भावना समजून घ्याल. आम्ही आपल्याला संपूर्ण सहकार्य करू. एवढेच नाही, तर यावेळी आपली व्यथा मांडताना, सभागृहात केवळ आकड्यांचीच भाषा समजली जाते आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या अनुभवाकडे, युक्तिवादाकडे आणि विचारांकडे लक्ष दिले जात नाही, असेही खर्गे म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, विरोधी पक्षाची संख्या कमी आहे, मात्र त्यांच्या अनुभवात आणि युक्तिवादात ताकद आहे. पण समस्या अशी आहे, की या ऐवजी संख्या मोजली जाते आणि विचारांकडे दुर्लक्ष केले जाते. सभागृहाच्या बैठका कमी झाल्याने दुर्बल घटकांतील लोकांना संवाद साधण्याची संधी कमी मिळते. काही वेळा विधेयकेही घाईघाईने मंजूर केली जातात. पूर्वी संसदेचे कामकाज वर्षभरात 100 दिवसांपेक्षाही अधिक चालायचे. मात्र, आता 60 ते 70 दिवसही चालू शकत नाही. सभागृहात बैठका झाल्या तर चांगले परिणाम येतील. या वेळी, काँग्रेसच्या स्थितीवर शायरान्या अंदाजात बोलताना त्यांनी विरोधकांना सल्लाही दिला.
पक्षाच्या स्थितीवर खर्गे म्हणाले... -मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाच्या स्थितीकडे इशारा करत म्हणाले, 'मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी.' यावेळी काँग्रेस अध्यक्ष खर्गे उपराष्ट्रपती यांना म्हणाले, की वरिष्ठ सभागृहाचे संरक्षक म्हणून आपली भूमिका इतर जबाबदाऱ्यापेक्षाही मोठी आहे. आपण भूमी पुत्र आहात आणि इथपर्यंत पोहोण्याचा प्रवास महत्वाचा आहे. आपल्याला संसदीय परंपरांची माहिती आहे. 9व्या लोकसभेत आपण निवडून आला होतात. आणि संसदीय कामकाज मंत्रालयात होते. आपण राज्यपालही राहिला आहात. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि राज्यांचे प्रतिनिधित्व करते. राज्यांचे राजकीय चित्र येथे दिसते. राज्यांतील अनेक दिग्गज नेत्यांनी या सभागृहाची शोभा वाढवली आहे.