सनातन धर्माबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. त्यात आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. प्रियांक खर्गे म्हणाले की, कुठलाही धर्म जो समान अधिकार देत नाही. तुमच्यासोबत माणसासारखं वर्तन करत नाही, तो आजारासारखाच आहे.
प्रियांक खर्गे म्हणाले की, जो धर्म समानतेला प्रोत्साहन देत नाही. तुम्हाला माणूस असल्याचा सन्मान मिळेल, याची निश्चिती करत नाही. तो माझ्या मतानुसार धर्म नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखीच भडकण्याची चिन्हे आहेत. त्यात काँग्रेसनेही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं विधान केलं होतं.
तामिळनाडू सरकारमध्ये क्रीडामंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी काल चेन्नईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये सनातन धर्माची तुलना डेंग्यु आणि मलेरियाशी केली होती. त्यांनी सनातन धर्माला समाप्त करण्याचं आवाहन केलं होतं.
एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील प्रमुख सदस्य आहे. त्यामुळेच उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर टीका केली जात आहे. त्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, हिंदूंना संपवण्याचं स्वप्न पाहणारे कित्येकजण राख झाले आहेत. घमंडिया आघाडीती घमंड्यांनो तुम्ही आणि तुमचे मित्र राहतील किंवा न राहतील, पण सनातन होता, सनातन आहे आणि सनातन राहील.