वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन, पण मित्रक्षाच्या झेंड्याने वाढवले टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 1:23 PM
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी असलेल्या केरळमधील एका स्थानिक पक्षाच्या झेंड्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.
वायनाड ( केरळ) - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांनी रोड शो करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या रोड शोमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत अनेक मित्र पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. मात्र या मित्रपक्षांपैकी इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या (आययूएमएल) झेंड्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीमध्ये अनेक छोट्या मोठ्या पक्षांचा समावेश असून, आययूएमएलचाही या आघाडीत समावेश आहे. मात्र या पक्षाच्या झेंड्याबाबत सोशल मीडियावर चर्चा आणि अफवा पसरत असून, त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे.
आज राहुल गांधी हे वायनाडमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आजच्या कार्यक्रादरम्यान मित्रपक्ष आययूएमएसच्या झेंड्याला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, असे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. त्यामुळे आययूएमएलचे महासचिव केपीए मजीद यांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. ''राहुल गांधी यांच्या वायनाड दौऱ्यादरम्यान आययूएमएलच्या झेंड्याला वा चिन्हाला दूर ठेवण्याबाबत काहीही निर्णय झालेला नव्हता. पक्षाने आपल्या स्थापनेपासूनचा हिरव्या झेंड्याचा अभिमानाने वापर केलेले आहे.'' असे केपीए मजीद यांनी सांगितले. वायनाड येथून राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये राहुल गांधी यांचे छायाचित्र घेऊन आययूएमएलचा हिरवा झेंडा घेऊन कार्यकर्ते जल्लोष करत होते. मात्र हा झेंडा पाकिस्तानचा असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान, आययूएमएलचे वायनाड जिल्हाउपाध्यक्ष टी मोहम्मद यांनी आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. ''आम्ही नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांना प्राधान्य दिले आहे.''असे त्यांनी सांगितले.
आययूएमएलचे नेते या पक्षाचा झेंडा पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या झेंड्याशी मिळता जुळता असल्याने हा झेंडा बदलण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आले होते. मुस्लिम यूथ लीगने हा झेंडा बदलण्याच सल्ला दिल्याचेही वृत्त होते. मात्र आययूएमएलचे नेते ई.टी. मोहम्मद बशीर यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते.