नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून 'संविधान बचाओ' अभियानाला सुरुवात करणार आहेत. संविधान आणि दलितांवर होणारे हल्ले हे मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडण्याच्या उद्देशानं 'संविधान बचाओ' अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाची सुरुवात आजपासून राजधानी नवी दिल्लीतील तालकटोर स्टेडिअममधून होणार आहे. या अभियानात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुशीलकुमार शिंदेदेखील सहभागी होणार आहेत.
दलित समाजातील प्रतिनिधीदेखील होणार सहभागीतालकटोरा स्टेडियममधून सुरुवात होणाऱ्या या अभियानामध्ये देशभरातील दलित समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये काँग्रेस आजी-माजी खासदार, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीतील पार्टीचे दलित समाजातील प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारीदेखील सहभागी होणार आहेत.
वर्षभर सुरू राहणार 'संविधान बचाओ' अभियानकाँग्रेसचे 'संविधान बचाओ' अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत (14 एप्रिल 2019) सुरू राहणार आहे. या अभियानासंदर्भात बोलताना एका काँग्रेस नेत्यानं सांगितले की, भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधान धोक्यात आले आहे. दलित समाजाला शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळत नाहीय. हे मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडणे, हा 'संविधान बचाओ' अभियानाचा उद्देश आहे.