नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या एक महिन्यानंतर राहुल गांधी पुन्हा पक्षात सक्रीय होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधी यांनी काँग्रस अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या बैठकीत ठेवला होता. मात्र हा राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत होती. राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या सक्रीय राजकारणापासून राहुल गांधी लांब राहण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र बुधवारपासून तीन राज्यांच्या नेत्यांची बैठक राहुल गांधी घेणार आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 26 जून, हरयाणामधील 27 जून तर दिल्लीतील नेत्यांची बैठक 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. या तीन राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी पक्षातंर्गत गटबाजी बाजूला सारत विधानसभा निवडणुकीची रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीनंतर प्रदेश नेतृत्वात बदल होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. संबंधित राज्यातील प्रभारी महासचिवही या बैठकीला उपस्थित राहतील.
काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारणी बरखास्त केली आहे. याठिकाणी नव्याने पदाधिकारी नेमण्याबाबत हालचाली सुरु आहेत. पक्षातील विधिमंडळ नेते अजय कुमार यांना पक्षातील संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत पक्षांतर्गत तक्रारीचं निरसन करण्यासाठी तीन सदस्यीय शिस्तभंग कमिटीची स्थापना करत पोटनिवडणुकीच्या देखरेखीसाठी दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे.
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्यापही सस्पेन्स आहे. राजीनामा परत घ्यावा यासाठी काँग्रेस कार्यकारणीचा आग्रह राहुल गांधींनी मंजूर केला की नाही हे स्पष्ट नाही. मागील आठवड्यात नवीन अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपासून राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाला एक महिन्याची मुदत दिल्याची चर्चा आहे.
तुम्हाला पक्षात योग्य वाटतील तसे फेरबदल करा, तसेच पक्ष हवा तसा चालवा, असे सांगण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी काही प्रमाणात मवाळ भूमिका स्वीकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यपद्धतीमधील काही अटींसह राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. अहमद पटेल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेला काही टप्प्यांमधील बैठकीनंतर राहुल गांधी या निर्णयाप्रत पोहोचले आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे.