नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली की काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, शरद पवार यांनी यावर खुलासा केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले.
आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे का? तुम्हाला राज्यसभेत विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर आहे का? या प्रश्नावर काँग्रेसला नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असावे, असे उत्तर शरद पवार यांनी यावेळी दिले. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे झाले, त्याची तपशीलवार माहिती घेतली. याशिवाय, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
याचबरोबर, समोर पर्याय दिसत नसताना मैदान सोडणे योग्य नाही, असे मत शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी दिलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर व्यक्त केले आहे. आपण असे अनेक पराभव पाहिलेले आहेत. यातून सावरण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. तो नक्कीच करता येईल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.