नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, माजी पतंप्रधान मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राहुल गांधी यांनी अद्याप राजीनामा दिला नसून अजून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे.
काही वृत्तवाहिन्यांकडून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, मात्र कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा फेटाळल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्या जवळचे लोक डाव्यांसारखे वागत असून त्यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेत असल्याचा सूर ही कार्यकारिणीच्या बैठकीत उमटत आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त चुकीचे आहे.काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी दिले आहे.