नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 27वी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं राजीव गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील भावनिक ट्विट केले आहे. ''जी लोकं तिरस्कारासोबत जगतात, त्यांच्यासाठी तिरस्कार हा एखाद्या कारागृहाप्रमाणे असतो. अशी शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली. त्यांनी मला सर्वांना प्रेम आणि आदर द्यायला शिकवले. एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेली ही सर्वात मौल्यवान भेट आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांचे आभार मानतो'', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी पुढे असेही म्हटले की, 'आम्हा सर्वांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या हृदयातील तुमचं स्थान कायम तसंच राहिले''. दरम्यान, राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.