नवी दिल्ली: जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. आतापर्यंत मोदींनी शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्जही माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यावरुन राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. 'काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला त्यांना सहा तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलेलं नाही,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसचा विजय हा गरीब जनतेचा, तरुणांचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे, असं राहुल यांनी म्हटलं. राहुल यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केलं. 'मोदींनी देशाला दोन भागांमध्ये विभागलं आहे. यातील एका भागात फक्त 15 जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांचं कर्ज लगेच माफ होतं. मात्र दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला काही मिळत नाही. शेतकऱ्यांचा एक रुपयादेखील माफ होत नाही. मात्र जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही,' असा इशारा राहुल यांनी दिला.