बंगळुरू: नाल्यातून निघणाऱ्या गॅसचा इंधन म्हणून वापर करत चहा तयार करणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी खिल्ली उडवली आहे. नाल्यात पाईप टाकून गॅस काढा आणि भज्या तळा, हीच पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची योजना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. कर्नाटकमधील बिदर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल यांनी मोदींवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. एका चहावाल्याचं उदाहरण देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील मोदींच्या विधानांचा राहुल गांधींनी समाचार घेतला. 'नाल्यातून निघणाऱ्या गॅसच्या मदतीनं रोजगार देण्याची योजना मोदी तयार करत आहेत. आधी मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता मोदी तरुणांना भज्या तळण्याचा सल्ला देत आहेत,' अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधान मोदींनी 10 ऑगस्टला जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात चहावाल्याचा किस्सा सांगितला होता. 'एका शहरात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चहा तयार करायचा. त्याच्या बाजूनं एक नाला वाहायचा. त्यानं एक छोटंसं भांडं पालथं घालून नाल्यावर ठेवलं. नाल्यातून निघणारा गॅस त्यानं आपल्या टपरीकडे वळवला आणि त्याच गॅसच्या मदतीनं तो चहा तयार करु लागला,' असा किस्सा मोदींनी सांगितला होता. मोदींच्या याच विधानावर राहुल गांधींनी सडकून टीका केली. नाल्यात पाईप टाकून गॅस जमा करा आणि भज्या तळा, हीच मोदींची रोजगार निर्मितीची योजना असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मोदींच्या धोरणांचा फायदा फक्त 15-20 लोकांना झाला आहे आणि मोदी देशातील तरुणांना भज्या तळायला सांगत आहेत, असं राहुल यांनी म्हटलं. मोदी देशाचे पंतप्रधान नसून केवळ 15-20 लोकांचे पंतप्रधान असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
नाल्यात पाईप टाकून भजी तळा; मोदींच्या 'त्या' विधानावर राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:24 PM