नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपद भूषवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधीं कुटुंबातील व्यक्तीची निवड न करता, इतरांची निवड व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे. अशा स्थितीत पक्षाचे अध्यक्षपद कोण भूषवणार, असा मोठा प्रश्न काँग्रेस नेत्यांसमोर आहे. राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधींना या पदाची जबाबदारी द्यावी, असा काहींचा आग्रह आहे. पण, राहुल यांनी प्रियांकांच्या नावालाही नकार दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल यांनी अद्याप कोणत्याही बिगर गांधींचे नाव घेतले नाही.
राहुल म्हणाले की, ज्याला पक्षाचा अध्यक्ष होण्याची इच्छा आहे, त्याने निवडणूक लढवावी आणि अध्यक्ष व्हावे. जो कोणी अध्यक्ष होईल त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू. आता राहुल यांनी नकार दिल्यानंतर प्रियंका यांनी त्यांची जागा घ्यावी, यासाठी राहुल यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राहुल यांनी प्रियंकांच्या नावास सहमती दर्शवली नाही तर सोनिया गांधींकडेच 2024 पर्यंत अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदरी असेल. पण, प्रकृतीच्या कारणास्तव सोनियांनी अध्यक्षपद इतरांना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या नावांवर चर्चा21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान पक्षाला अध्यक्षपदाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. येत्या 15 दिवसांत याबाबतची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये सोनिया गांधी आणि 2019 मध्ये राहुल यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे पक्षाने गैर-गांधींना अध्यक्ष करावे, असे राहुल यांचे मत आहे. पण, काँग्रेस नेते राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल तयार नसेल तर प्रियांका आणि त्याही तयार नसतील तर सोनियांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अंबिका सोनी, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल, कुमारी सेलजा आणि मुकुल वासनिक, या नेत्यांची नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.