नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. या वृत्तानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत, त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना केली आहे. ट्विटमध्ये मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी जी COVID-19 मधून लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना करतो.''
यापूर्वी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या त्यातील काही नेतेदेखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यानंतर, सोनिया गांधी यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले असून आपल्या संपर्कात आलेल्यांनाही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केल्याचे सुरजेवालांनी म्हटले आहे. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून 8 जूनपर्यंत बऱ्या होतील, असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, काँग्रेस अध्यक्ष आठ जून रोजी ईडी समोर हजर होतील, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
8 जून रोजी ईडीची चौकशी -सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने चौकशीसाठीची नोटीस पाठवली आहे. त्यांना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.