"देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय"; सोनिया गांधींची बोचरी टीका
By देवेश फडके | Updated: January 22, 2021 13:34 IST2021-01-22T13:32:51+5:302021-01-22T13:34:40+5:30
अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

"देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय"; सोनिया गांधींची बोचरी टीका
नवी दिल्ली : अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी यावेळी केली.
अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल प्रकरणी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, अलीकडेच चिंतेत टाकणाऱ्या बातम्या आम्ही पाहिल्या. देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड करण्यात आली आहे. जी लोक देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटत फिरत होती. त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे, असे त्या म्हणाल्या. खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार उतावीळ झाले आहे, असेही सोनिया गांधी यांनी सांगितले.
एका आठवड्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. आगामी अधिवेशन अर्थसंकल्पी असले, तरी जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, ते पाहायला हवे, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेच्या नावाखाली असंवेदनशीलता आणि अहंकार दाखवला आहे, असा आरोप करत कृषी कायदे आणण्यात केंद्र सरकारने घाई केली. संसदेतील सदस्यांना यावर विचार करायला किंवा याच्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा दावा सोनिया गांधी यांनी केला.