सोनिया गांधी यांनी तिसऱ्या लाटेबाबत केले सावध; काँग्रेस नेत्यांशी साधला व्हर्च्युअल संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:54 AM2021-06-25T10:54:34+5:302021-06-25T10:55:01+5:30
सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने सावध राहायला हवे. यासाठी आतापासूनच महत्त्वाची पावले टाकावी लागतील. जेणेकरून लहान मुलांना या संकटापासून वाचवता येऊ शकेल, असे मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.
सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअल बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी लसीकरणात आपली महत्त्वाची भूमिका पार पाडावी. राष्ट्रीय स्तरावर लसीकरणाचा दैनिक दर तिप्पट करावा लागेल. म्हणजे यावर्षी अखेरपर्यंत ७५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण होऊ शकेल.
संघटन मजबूत करा
आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे संघटन मजबूत करावे लागेल, असे सांगून त्यांनी पक्षातील गटबाजीबाबत चिंता व्यक्त केली. पक्ष कमजोर होत असून विरोधक त्याचा फायदा घेत आहेत, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाबाबत पक्षाने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, प्रादेशिक भाषांमध्येही ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध व्हायला हवी. महागाई, बेरोजगारी, पेट्रोल- डिझेलची दरवाढ यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, या मुद्यांवरून लोकांमध्ये जा आणि त्यांना मोदी सरकारच्या कुशासनाची माहिती द्या.