नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिले आहे. त्यांनी काँग्रेस शासित राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या केल्या आहेत. पहिल्या मागणीनुसार, राज्यांकडे तीन ते पाच दिवसांचाच व्हॅक्सीन साठा शिल्लक आहे, यामुळे तत्काळ व्हॅक्सीन पुरवठा करण्यात यावा. दुसऱ्या मागणीनुसार, कोविड संबंधित इंफ्रास्ट्रक्चर जीएसटी फ्री करण्यात यावे. तसेच तिसऱ्या मागणीनुसार, महामारीमुळे प्रभावित झालेल्या गरिबांना 6000 रूपये देण्यात यावेत. याशिवाय, मोठ्या शहरांतून आपल्या घरी परतत असलेल्या लोकांसाठी ट्रांसपोर्टेशनची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.
दिल्लीत सीरो सर्व्हेचा सहावा टप्पा सुरू -दिल्लीत कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असतानाच सोमवारी सिरोलॉजिकल सर्वेक्षणाच्या सहाव्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. याचा उद्देश लोकांमधील कोरोना व्हायरसविरोधातील अँटीबॉडी तपासणे असा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत 272 वार्डमधून 28,000 नमूने घेतले जातील. अर्थात प्रत्येक वर्डमधून 100 नमूने घेण्यात येणार आहेत. दिल्लीची एकूण लोकसंख्या 2 कोटींहून अधिक आहे.
पंतप्रधान मोदींची राज्यपालांसोबत बैठक -संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील सर्व राज्यपालांसोबत बैठक करणार आहेत. केंद्रशासित प्रदेशांतील उपराज्यपालही या बैठकीत सहभागी होणार आहेत. 14 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेही राज्यपालांसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोरोना परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होईल.
70 टक्के कोरोनाबाधित केवळ 5 राज्यांत -गेल्या 24 तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक 1.70 लाख कोरोनाबाधित समोर आले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाचे आतापर्यंतचे जवळपास सर्वच विक्रम मागे पडले आहेत. 70 टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्ण केवळ 5 राज्यांतूनच समोर आले आहेत. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळचा समावेश आहे. आता विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे.