ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - काँग्रेस पक्षाकडून काल पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने काल जाहीर केल्या कार्यक्रमानुसार 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होईल. काँग्रेस अध्यक्षाची निवड 2015 पर्यंत होणे अपेक्षित होते परंतु काही कारणांमुळे या प्रक्रियेला वेळ लागला. निवडणूक आयोगाने फटकारल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी काँग्रेसला अंतर्गत निवडणूक घ्यावी लागते. त्यामध्ये पक्षाच्या अध्यक्षाची निवड होते. 2015 मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. पण आत्तापर्यंत यासाठी तीनवेळा मुदतवाढ मागत काँग्रेसनं चालढकल केली आहे. नव्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधीचा राज्याभिषेक होणार का? याकडे देशाचे लक्ष लागून आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी राहूलकडे सुत्रे देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे दिली जाण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास उत्सुक असून प्रक्रियेनुसारच ते अध्यक्ष होतील असे एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने काही दिवसांपूर्वी एका पेपरला मुलाखत देताना सांगितले होते. तत्पूर्वी सोनिया गांधी यांनीदेखील राहुल यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सोपविण्याबाबत सूचक विधान केले होते. राहुल गांधी यांच्याकडे जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा तुम्हाला आपोआप समजेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आगामी संघटनात्मक निवडणुकीत राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यात येतील, हे जवळपास निश्चित झाले होते.सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. गेल्या 19 वर्षांपासून त्या या पदावर आहेत. त्या आता विश्रांती घेतील आणि राहुल गांधी हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील असे या नेत्याने सांगितले होते.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, राहुल गांधीचा होणार राज्याभिषेक?
By admin | Published: April 18, 2017 7:31 AM