ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्याच पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. राष्ट्रपतींच्या नावाआधी किमान 'श्री' लावण्याची तरी नैतिकता दाखवावी असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षाला धारेवर धरलं.
कॉग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा एक जुना फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोखाली 'श्री राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी 1985.' असं कॅप्शन देण्यात आलं.
यामध्ये राजीव गांधींच्या नावाआधी 'श्री' लावण्यात आलं पण प्रणव मुखर्जींच्या नावाआधी 'श्री' लावण्यात आलं नव्हतं. यावर शर्मिष्ठा नाराज झाल्या आणि आपला संताप व्यक्त करत त्यांनी ''किमान नावाआधी 'श्री' वापरण्याची तरी नैतिकता दाखवायला हवी होती. अखेर ते देशाचे वर्तमान राष्ट्रपती आहेत'' असं ट्विट केलं.
At least have the courtesy to add 'Shri' before Pranab Mukherjee as he happens to be the current President of India https://t.co/7lsp0tfFec— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) March 14, 2017
शर्मिष्ठा यांच्या ट्विटनंतर कॉंग्रेस पक्षाने तात्काळ ते ट्विट डिलीट करत सुधारणा करून नवं ट्विट केलं. राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळण्याआधी मुखर्जी हे कॉंग्रेस पक्षाचे जवळपास 50 वर्ष नेते होते याशिवाय कॉंग्रेसच्या सरकारमध्ये अनेक मंत्रीपदं त्यांनी सांभाळली.
Shri Rajiv Gandhi and Shri Pranab Mukherjee, 1985 pic.twitter.com/CQ6Mn6HryX— INC India (@INCIndia) March 14, 2017