“BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:41 PM2023-05-02T19:41:37+5:302023-05-02T19:43:10+5:30
Prithviraj Chavan Reaction On NCP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
Prithviraj Chavan Reaction On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होणार असून, यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे.
एकाबाजूला राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १० मे रोजी कर्नाटकात निवडणुका होणार असून, राज्यातील अनेक नेते, मंत्री कर्नाटकातील विविध ठिकाणी प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी येथील एका प्रचारसभेत बोलताना मोठे विधान केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी किती दिवस काँग्रेससोबत राहील हे माहीत नाही
काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचे काम भाजपाकडून केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे. रोज बातम्या येतात, कोणता नेता जाणार आणि कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचं ते बघतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल यासाठी मतांची टक्केवरी वाढवण्याकरता ते निवडणूक लढतायत. परंतु भजपाची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचारसभेत बोलताना सांगितले.
दरम्यान, मला त्याविषयी माहिती नाही. मला इतकेच माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. आमची एकी आणि वज्रमूठ राज्याने पुन्हा पाहिली. त्या सभेत व्यासपीठावर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण असे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावर बोलताना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"