ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमने काँग्रेस पक्ष कौटुंबिक संपत्ती झाल्याची टीका केली आहे. काँग्रेसवर बोलताना देशातील एका राजकीय पक्षासाठी अजूनही खूप संधी असल्याचंही ते बोलले आहेत. अनेक पक्षांमध्ये कौटुंबिक वर्चस्व निर्माण झालं असून, नवीन पीढीच्या नेत्यांसाठी त्यांनी दरवाजे बंद केले असल्याचं कार्ती चिदंबरम बोलले आहेत. जनरेशन 67 संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कार्ती चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं.
'काँग्रेससहित अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष कुटुंबाची खासगी संपत्ती झाली आहे, आणि यांच्यामध्ये काही सुधारणा होईल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत जर कोणी नवीन व्यक्ती राजकरणात येण्याचा प्रयत्न करत असेल तर या सिस्टममध्ये तो फिट बसणार नाही. कारण यासाठी त्याला पक्षप्रमुख किंवा दुस-या नेत्यांची खुमात करत बसावी लागेल', असं कार्ती चिदंबरम बोलले आहेत.
कार्ती चिदंबरम पुढे म्हणालेत की, 'कोणत्याही राजकीय पक्षाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई किंवा एखाद्या IIT टॉपरला निवडणूक लढण्यासाठी आमंत्रण दिलं का ? मग तो काँग्रेस असो किंवा भाजपा, डीएमके आणि अण्णाद्रुमूक. सर्व पक्ष एखाज्या कुटुंबाकडून चालवले जात असून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळण्याची काही शक्यताच नाही'.