नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा शैक्षणिक पात्रतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. स्मृती इराणी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केले नाही, असे नमूद केले आहे. यावरुन काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या टीव्ही सिरिलच्या थीम लाईनवरुन स्मृती इराणी यांना लक्ष केले आहे. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते एफिडेविट नए हैं'!... तसेच, आता एक नवीन टीव्ही सिरीयल येणार आहे. या सिरियलची ओपनिंग लाइन 'क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं' अशी असणार असल्याचे सांगत प्रियंका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला.
(स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ; 89 लाख रुपये बँक खात्यात )दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे शिक्षण, त्यांची पदवी कायमच वादात राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी स्मृती इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून मोठा वाद झाला होता. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचे स्मृती इराणी यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते. मात्र, आता काल लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळी माहिती दिली आहे. त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
(स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत ; निवडणूक शपथपत्रातून माहिती समोर)
स्मृती इराणी या अमेठी मतदार संघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्येही त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी यांनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.