नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी लखनऊमधील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याच दरम्यान तृणमुलने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमच्या पक्षाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. तृणमुल काँग्रेसने (TMC) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.
"ममता बॅनर्जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने या देशातील राजकारणात महिलांचा वाढता सहभाग निश्चित करण्यासाठी मार्ग दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवणारा आमचा पहिला पक्ष आहे" असं तृणमुल काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "काँग्रेससारखा पक्ष त्यांच्या वाईट दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आमचं (टीएमसी) अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काँग्रेस गांभीर्यपूर्वक याबद्दल घोषणा करत असेल तर त्यांनी केवळ उत्तर प्रदेशमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात" असं देखील तृणमूलने म्हटलं आहे.
"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव"
पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला 40 टक्के महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले आहे.
माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्षाने यूपीतील शोषित महिलांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 'मी एक मुलगी आहे, मी लढू शकते' हा काँग्रेसचा नारा आहे. आपल्याला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावेच लागेल. महिलांना गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले जाईल. याची सुरुवात 40 टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात 50 टक्के महिलांना तिकिटे दिली जाईल. इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. काँग्रेस त्यांना निवडणूक लढवण्यास मदत करेल, असं प्रियंका म्हणाल्या.