नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 120 रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही 100 रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे 5 रूपयांनी तर डिझेलचे दर हे 10 रूपयांनी कमी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
मोदी सरकारच्या इंधन दरकपातीच्या निर्णयाची प्रियंका यांनी खिल्ली उडवली आहे. भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हा मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय आहे. वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर मिळेल" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर 5 रूपयांनी आणि डिझेलचे दर 10 रूपयांनी कमी होणार आहेत. नवे दर गुरूवार पासून लागू होणार आहेत. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ दिवाळीच्या तोंडावर बुधवारी थांबली होती. यापूर्वी पेट्रोलच्या दरात सलग 7 दिवस तर डिझेलच्या दरात सहा दिवस 35-35 पैशांची वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर 110.04 रूपये तर डिझेलचे दर 98.42 रूपये प्रति लीटर इतके होते.
दरम्यान, गुरूवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 115.85 रुपयावर स्थिर होता. तर दिल्लीत पेट्रोल 110.04 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 106.66 रुपये, कोलकात्यात एक 110.49 रुपये तर भोपाळमध्ये आज पेट्रोलचे दर 118.83 रुपये इतके होते. तर दुसरीकडे मुंबईत डिझेलचा दर 106.62 रुपये इतका होता.