काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी लाडक्या भावासाठी खास पोस्ट केली आहे. तू नेहमीच माझा मित्र आणि मार्गदर्शक आहेस असं म्हटलं आहे. राहुल गांधी आज ५४ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म १९ जून १९७० रोजी दिल्लीत झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियंका गांधी यांनी त्यांचा राहुल यांच्यासोबतचा एका छान फोटो शेअर केला आहे. एका राजकीय कार्यक्रमाशी संबंधित हा फोटो असून यामध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना दिसत आहेत. "माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याचा जीवनाबद्दलचा अनोखा दृष्टीकोन, जग आणि प्रत्येक गोष्टींचा मार्ग उजळवतो. नेहमी माझा मित्र, माझा सहकारी, तार्किक मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि नेता. चमकत राहा. माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम" असं प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांप्रती तुमची अतूट बांधिलकी आणि लाखो न ऐकलेल्या आवाजांप्रती तुमची जबरदस्त करुणा हे गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करतात" असं म्हटलं आहे.
"सत्याचा आरसा हातात धरून शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे मिशन"
"विविधतेत एकता, समरसता आणि करुणा ही काँग्रेस पक्षाची नीतिमत्ता तुमच्या सर्व कृतीतून दिसून येते, कारण तुम्ही सत्याचा आरसा हातात धरून शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे तुमचे मिशन सुरू ठेवत आहात. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा" असंही खरगे यांनी म्हटलं आहे.
"उज्ज्वल भविष्यासाठी भारताची उज्ज्वल आशा"
केसी वेणुगोपाल यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "आमचे लाडके नेते राहुल गांधीजी यांना शुभेच्छा देणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांमध्ये मी स्वत: सामील होतो. राहुलजी हे भारतातील गरीब, वंचित आणि मागासलेल्या नागरिकांचे निर्विवाद नेते आहेत. ते आवाज नसलेल्या लोकांचा आवाज आहेत. दुर्बलांसाठी शक्तीचा स्तंभ, आपल्या राज्यघटनेचे रक्षक आहेत, न्यायाचे योद्धे आहेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी भारताची उज्ज्वल आशा आहेत" असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.