नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बलात्काराबाबत बादग्रस्त विधान केलं आहे. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गाधी यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या चांगल्याच संतापल्या आहेत. "हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं" असं म्हटलं आहे. के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'बलात्कार रोखता येत नसेल तर झोपून राहा आणि त्याचा आनंद घ्या' असं म्हटलं आहे. गंभीर बाब म्हणजे रमेश कुमार यांच्या या विधानावर आक्षेप न घेता विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला.
रमेश कुमार यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही करण्यात येत आहे. प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी आमदाराला चांगलेच फटकारले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रमेश कुमार यांनी जे विधान केले आहे त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करत आहे. बलात्कार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याबाबत असं कोणी बोलूच कसं शकतं? हे अक्षम्य आहे" असं म्हटलं आहे. विधानसभेतील कामकाजादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा जोरदार व्हायरल झाला आहे. देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडिया आणि भाजपा नेत्यांनी या वक्तव्यावरुन त्यांना चांगलंच फटकारलं असून कारवाईची मागणी जोर धरत आहे. त्यामुळेच, रमेश कुमार यांनी विवादित विधानावरुन विधानसभेत माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील, तर माफी मागण्यास मला काहीही गैर वाटत नाही. मी मनाच्या अंत:करणापासून माफी मागतो, असे कुमार यांनी म्हटलं. दरम्यान, कुमार यांनी माफी मागितल्यानंतर विधासभा अध्यक्ष हगडे यांनीही हे प्रकरण आता वाढवू नये, त्यांनी माफी मागितली आहे, असं म्हटलं आहे.
"मुलींच्या लग्नाचं वय 16-17 करावं कारण उशीर झाला तर त्या अश्लील व्हिडीओ पाहतील"
समाजवादी पक्षाच्या खासदाराने यावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. "मुली 16 व्या वर्षी आई बनू शकतात, तेच त्यांचं लग्नाचं वय असावं" असं म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन (MP ST Hasan) यांनी "मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न 16 व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही" असं म्हटलं आहे. तसेच "जर मुलगी 18 व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 16-17 करण्यात यावे. लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ (पोर्नोग्राफी) पाहत बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं" असं देखील एसटी हसन यांनी म्हटलं आहे.