Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते, तर अशा गोष्टी बोलले नसते. देशात नोटाबंदी केली, तेव्हा महिलांची बचत हिसकावली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांनी जीव गमावला, पंतप्रधान मोदी यांनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेबाबत जे घडले, तेव्हा नरेंद्र मोदी गप्प होते, त्यांनी तिच्या मंगळसूत्राचा विचार केला का? आता ते महिलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. महिलांना घाबरवले जात आहेत. जेणेकरून भीतीने महिला मतदान करतील, या शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
बंगळुरू येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसवाल्यांना मंगळसूत्र आणि सोने हिसकावून घ्यायचे आहे, अशा गोष्टी गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. हा देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, ५५ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग तुमचे सोने आणि मंगळसूत्र कोणी हिसकावले का? देशाला युद्धाला सामोरे जावे लागले तेव्हा, इंदिरा गांधींनी आपले सोने देशाला दिले होते. माझ्या आईचे मंगळसूत्र (राजीव गांधी) या देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
गेल्या १० वर्षांत सामान्यांसाठी केंद्र सरकारने काही काम केले नाही हे सत्य आहे
पंतप्रधान मोदींसारख्या देशातील नेत्याने नैतिकता सोडली आहे. लोकांसमोर नाटके सुरू आहेत. सत्याच्या मार्गावर चालत नाही. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांत केंद्रातील सरकारने कोणतेही काम केलेले नाही हे सत्य आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. तसेच सत्याच्या मार्गावर चालणे. सामान्यांची सेवा करणे, देशसेवा करणे, ही हिंदू तसेच राजकीय परंपरा आहे. यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी, त्यांचा पक्ष कोणताही असो, देशाच्या लोकांसाठी त्यागाच्या भावनेने काम केले. खोट्या मोदी सरकारने अन्य राज्यातील सरकारे पाडण्यासाठी सर्व लोकशाही मूल्ये मोडीत काढली. या भाजपाचा निषेध करण्याचे धाडस कोणी करत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
दरम्यान, भाजपाचे नेते कधीही रोजगार, शिक्षण, आरोग्य यांवर बोलत नाहीत. ते केवळ चिथावणीखोर भाषणे देतात. लोक म्हणतात की, नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत महान नेते आहेत. गर्वाने आणि अहंकाराने सांगितले जाते की, नरेंद्र मोदी जगात सुरू असलेली युद्धे क्षणार्धात थांबवू शकतात. मग मला तुम्हाला विचारायचे आहे की, जर ते इतके मोठे नेते असतील, त्यांचा इतका प्रभाव असेल, तर रोजगार निर्माण करण्यात अपयशी का ठरले, महागाई का कमी होऊ शकली नाही. तरुणांसाठी कोणतीही नवीन योजना का आणली नाही आणि तुमच्या कुटुंबात विकास का झाला नाही, असे एकामागून एक प्रश्न प्रियंका गांधींनी केले.