नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रियंका गांधी गेल्या कित्येक तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. याच दरम्यान आता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" असा संतप्त सवाल करत प्रियंका यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या 28 तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" अशी विचारणा प्रियंका यांनी ट्विटमधून केली आहे. यावेळी त्यांनी त्यादिवशी झालेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत" असं राहुल यांनी म्हटलं आहे.
"तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत"
राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितलं आहे. तसेच "प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
"शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले"
शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला. शेवटी तेच झालं जे वाटत होतं, महात्मा गांधींच्या लोकशाही देशात गोडसेंच्या भक्तांनी, मोठ्या पावसात आणि पोलिसांशी संघर्ष करत शेतकऱ्यांच्या भेटीस निघालेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना हरगाव येथून अटक केली, असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे. श्रीनिवास यांच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.