नवी दिल्ली - फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारी रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी बंद झाले होते. ठप्प झालेल्या या सेवेमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. देशामध्ये याला राजकीय वळण देखील दिलेलं पाहायला मिळत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप बंद झाल्यानंतर अनेकांनी यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं. याच दरम्यान प्रियंका गांधी यांचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअॅप बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अगदी काँग्रेसच्या खासदारांपासून ते आपच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच हा दावा केल्याचं आता पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "असं दिसतंय की, जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केलं आहे. प्रियंका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी हे करण्यात आलं" असा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडीओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअॅप बंद झाले आहेत. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
"लखीमपूर शेतकरी नरसंहाराचं सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलं गेलं आहे?"
काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक यांनी "व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यापूर्वी कधी इतका वेळ बंद होतं का? हे डाऊन झालं आहे की लखीमपूर शेतकरी नरसंहाराचं सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलं गेलं आहे? नवीन व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी?" असं म्हटलं आहे. तसेच पंखुरी पाठक यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये "वायफाय आणि मोबाईल इंटरनेटचा स्पीड देखील कमी करण्यात आला आहे. जिओ अनेक लोक वापरतात, तेही बंद करण्यात आलं आहे. टीव्हीनंतर आता या लोकांना इंटरनेटवरील बातम्या आणि माहितीवर देखील पूर्ण नियंत्रण हवं आहे. हे खूप धोकादायक आहे" असं म्हटलं आहे.
"अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?"
प्रियंका गांधी गेल्या कित्येक तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. याच दरम्यान आता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" असा संतप्त सवाल करत प्रियंका यांनी जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या 28 तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का?" अशी विचारणा प्रियंका यांनी ट्विटमधून केली आहे. यावेळी त्यांनी त्यादिवशी झालेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.