योगी आदित्यनाथ सरकारमधील कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी डाळींच्या किमतीवर विधान केलं आहे. ज्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे
"पीठ आणि डाळीची किंमत तर सर्वसामान्य लोकांना माहीत आहे, मंत्री आणि अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त होते" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी यासोबतच एक पोस्टर देखील शेअर केलं आहे. ज्यामध्ये एका रिपोर्टचा हवाला देण्यात आला आहे.
"२०१९ मध्ये रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराच्या शेजारील २५ गावांमध्ये २५०० हून अधिक प्लॉटची खरेदी, विक्री केली गेली. ज्यामध्ये जमीन विकत घेतलेल्या अनेक लोकांच्या अशा लिंक उघड झाल्या जे एकतर राजकारणी किंवा अधिकारी किंवा स्थानिक नेते होते."
"यासोबतच डाळींचा भाव १०० रुपये किलो आहे असं म्हणून हसणारे मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी ही दराची यादी पाहावी" असं पोस्टरमध्ये म्हटलं आहे. तूर डाळ १८० रुपये किलो, राजमा १७० रुपये किलो, काळे उडीद १३० रुपये किलो, मूग डाळ १२० रुपये, असा बाजारात भाव आहे" असंही म्हटलं आहे.
यूपीच्या कृषीमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, डाळीचे दर १०० रुपये किलोपेक्षा जास्त नाहीत. १०० रुपये किलो दराने डाळ उपलब्ध आहे. यावर पत्रकारांनी त्यांना १०० रुपये किलोची डाळ कुठे मिळते?, असा प्रश्न विचारला असता मंत्री सूर्य प्रताप शाही हसू लागले. प्रियांका गांधी यांनी कृषीमंत्र्यांच्या या विधानावर आता जोरदार निशाणा साधला आहे.