नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "योगी आदित्यनाथ यांच्याकडून आपल्याला धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा आणला आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
प्रियंका गांधी यांनी "योगीजींना माहीत आहे का मी कोणत्या मंदिरात जाते आणि कधीपासून जात आहे? त्यांना माहीत आहे का की मी वयाच्या 14 व्या वर्षापासून उपवास करतेय? त्यांना काय माहिती आहे? ते मला माझ्या धर्माचे किंवा माझा कोणत्या धर्मावर विश्वास आहे, याचे प्रमाणपत्र देतील का? मला त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही" असं म्हटलं आहे. तसेच "आम्हाला खरोखरच महिलांना सक्षम बनवायचे आहे, आम्ही राज्याच्या निवडणुकीत पक्षाची 40 टक्के तिकिटे महिलांसाठी राखून ठेवण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे, जेणकरून ते समान होईल" असं म्हटलं आहे.
प्रियंका गांधींनी महिलांसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात, मुलींना शैक्षणिक आधारावर स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देऊन त्यांचे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल असं म्हटलं आहे. काँग्रेस मुलींना दिलेले वचन पूर्ण करेल आणि त्यांना शिक्षण उपलब्ध करून देईल. महिलांना समान अधिकार आणि सन्मान मिळाल्यावरच महिला सक्षमीकरण शक्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांनी "उत्तर प्रदेशचे तरुण हातात मेणबत्तीचा प्रकाश घेऊन रोजगार द्या ही मागणी करत होते. मात्र योगी सरकारने त्या तरुणांवर लाठीचार्ज केला. तरुणांनो यांनी कितीही लाठीचार्ज करू द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई थांबू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे" असं म्हटलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं.