रायबरेली (उत्तर प्रदेश) : पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.
प्रियांका गांधी यांनी भाऊ आणि काँग्रेसचे रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ येथे प्रचारसभेला सभेला संबोधित करताना आरोप केला की, भाजप मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी निवडणूक प्रचारात धर्माचा आधार घेत आहे.
लोकांना समजून घेण्यासाठी ते चालले
राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले. त्यानंतर माझ्या भावाने एक जाहीरनामा बनवला. ज्याद्वारे महागाई आणि बेरोजगारी या जनतेच्या सर्वांत मोठ्या समस्या सोडवता येतील, असे सांगत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या न्याय पत्राची आठवण करून दिली.
राज्यपालांचा राजीनामा का नाही : ममता
अमडंगा (पश्चिम बंगाल) : विनयभंगाचा आरोप असलेल्या राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर पंतप्रधान कारवाई केव्हा करणार, त्यांना राजीनामा देण्यास का सांगितले जात नाही’, असे प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी उपस्थित केले. उत्तर २४ परगणा येथील प्रचारसभेत बॅनर्जी म्हणाल्या की, संदेशखालीबाबत भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे.