नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये फोन टॅपिंग हे प्रकरण गाजत आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यूपी सरकार त्यांचा फोन टॅप करतं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्याचं बोलणं ऐकतात असा दावा केला आहे. तसेच त्यांनी सपा कार्यालयाचे सर्व फोन कॉल्स ऐकले जातात. जरी पत्रकारांनी संपर्क साधला तरी ते बोलणं देखील ऐकलं जातं असं म्हटलं आहे. यावरूनच प्रियंका यांनी सरकारचं काम काय आहे? तर विकास करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, अत्याचार रोखणं असं आहे. पण येथे सरकार हे विरोधी पक्षाचे फोन टॅप करण्यात व्यस्त आहे असं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमावर देखील टीका केली आहे.
'हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं'
कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बलात्काराबाबत बादग्रस्त विधान केलं आहे. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. याच दरम्यान प्रियंका गाधी यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या चांगल्याच संतापल्या आहेत. "हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं" असं म्हटलं आहे. के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'बलात्कार रोखता येत नसेल तर झोपून राहा आणि त्याचा आनंद घ्या' असं म्हटलं आहे. गंभीर बाब म्हणजे रमेश कुमार यांच्या या विधानावर आक्षेप न घेता विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला.
रमेश कुमार यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही करण्यात येत आहे. प्रियंका गांधी यांनी आमदाराला चांगलेच फटकारले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं. "रमेश कुमार यांनी जे विधान केले आहे त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करत आहे. बलात्कार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याबाबत असं कोणी बोलूच कसं शकतं? हे अक्षम्य आहे" असं म्हटलं आहे. विधानसभेतील कामकाजादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा जोरदार व्हायरल झाला आहे. देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.