केरळमधील वायनाड येथे निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी एक हृदयस्पर्शी क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काही महिन्यांनी मदर तेरेसा माझ्या घरी निवडणुकीच्या एका बैठकीसाठी आल्या आणि त्यांनी मला निराधार लोकांसाठी काम करण्यास सांगितलं.
आपला आनंद व्यक्त करताना प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, "मला मिळालेल्या प्रेमाने मी खूप भारावून गेले आहे. काही दिवसांपूर्वी मी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. मी आल्यावर इथे थांबले आणि लोकांशी बोलले. त्यापैकी एक जण सैन्यात होते. त्यांनी मला सांगितलं की, त्यांच्या आईला मला भेटायचं आहे, परंतु त्यांना चालत येणं शक्य नाही. म्हणून मी त्याच्या घरी गेले आणि त्यानंतर त्यांनी मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मिठी मारली."
"तुम्हाला सांगू शकत नाही... इतका आनंद झाला. मला त्याच्या आणि माझ्या आईमध्ये काही फरक जाणवला नाही. मला वाटलं की, माझी आई माझ्यासोबत वायनाडमध्ये आहे. जेव्हा मदर तेरेसा माझ्या वडिलांच्या निधनानंतर सहा ते सात महिन्यांनी माझ्याकडे आल्या होत्या, त्यावेळी मला ताप आला होता. मी माझ्या रूममधून बाहेर गेले नव्हते. मग त्या स्वतः माझ्या रूममध्ये आल्या आणि तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला."
"माझा हात त्यांनी धरला आणि माझ्या हातात एक गुलाबाचं फूल ठेवलं. मग त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करायला सांगितलं. ५-६ वर्षांनंतर मी माझ्या बहिणींसह त्यांच्या घरी काम करायला गेले होते. लहान मुलांना शिकवणं, बाथरूम स्वच्छ करणं आणि जेवण बनवणं हे माझं काम होतं. यानंतर मला त्यांच्या वेदना आणि सेवा म्हणजे काय हे समजलं."
"वायनाडमध्ये भूस्खलनाच्या वेळी सर्व समुदाय एकमेकांना कशी मदत करत होते हे मी पाहिले आहे. तुम्ही सर्वांनी सर्वांना मदत केली... तुम्ही सर्व धैर्यवान लोक आहात याचा मला अभिमान वाटतो" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.