नवी दिल्ली - नोटबंदीला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे अनेक दिवस लोकांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागल्या. पैशांसाठी बँकांबाहेर रांगा लावाव्या लागल्या. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी सोमवारी नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला? असा सवाल विचारत प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच नोटबंदी ही एक आपत्ती असल्याचं देखील म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. "नोटबंदी यशस्वी झाली असेल तर भ्रष्टाचार का नाही संपला?, काळा पैसा का परत आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? दहशतवाद का संपत नाही? महागाई नियंत्रणात का नाही?" असे प्रश्न प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत. यासोबतच प्रियंका यांनी Demonetisation Disaster हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर 120 रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही 100 रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे 5 रूपयांनी तर डिझेलचे दर हे 10 रूपयांनी कमी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
"मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय, वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत लुटीचे उत्तर मिळेल"
मोदी सरकारच्या इंधन दरकपातीच्या निर्णयाची प्रियंका यांनी खिल्ली उडवली आहे. भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हा मनापासून नाही तर भीतीने घेतलेला निर्णय आहे. वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर मिळेल" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर 5 रूपयांनी आणि डिझेलचे दर 10 रूपयांनी कमी होणार आहेत. नवे दर गुरूवार पासून लागू होणार आहेत. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.