नवी दिल्ली - हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असं पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर प्रदेश सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
प्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यासोबतच प्रियंका यांनी मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्कारासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. "संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?"
"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?, आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?. आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?" असं ट्विट प्रियंका यांनी केलं आहे. तसेच या प्रश्नांची उत्तरं मिळवणं हा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की, हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहील. आम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार. न्याय झाला नाही तर ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तर आपल्याला न्याय हवाय अशी मागणी पीडित कुटुंबाने आमच्याकडे केली आहे. तसेच या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पीडित तरुणीच्या कुटुंबाची राहुल आणि प्रियंका गांधींनी घेतली भेट
सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.