आशिया चषकाच्या सुरुवातीलाच स्पर्धेची मुख्य लढत होत आहे. भारत-पाकिस्तान, क्रिकेटविश्वातील सर्वांत मोठी लढत आज रंगणार आहे. विशेष म्हणजे जगभरातून सुमारे १.५ अब्ज क्रिकेटप्रेमी या रोमांचक सामन्याचा आनंद घेतील. पूर्वीच्या काळी अनेक संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेची रचना अशा पद्धतीने व्हायची, जिथे भारत-पाकिस्तान सामना बाद फेरीत व्हायचा. यामुळे स्पर्धेकडे चाहत्यांकडे अधिक लक्ष राहील आणि आर्थिक फायदाही करून घेता येईल, हा त्यामागचा उद्देश असायचा; पण आता त्या कल्पकतेला महत्त्व राहिले नाही. कारण आज, भारत-पाकिस्तान हा सामना कोणत्याही स्पर्धेत आणि क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ‘ब्लॉकबस्टर’च ठरतो. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच कराचीमधली एक खास आठवण देखील सांगितली आहे. प्रियंका यांनी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असे म्हणत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. "भारत पाकिस्तान सामन्याविषयी माझी खूप खास आठवण आहे. खूप वर्षांपूर्वी मी कराचीला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेले होते. भारतीय संघाने सामना जिंकला तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. काँग्रेस-भाजपाचे सर्व नेते आनंदाने उड्या मारत होते" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
आयसीसी असो किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आयोजक म्हणून त्यांना २००७ सालच्या टी-२० स्पर्धेचा थरार अपेक्षित असतो. त्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामीला आणि अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडले होते. हे दोन्ही सामने अत्यंत रोमांचक रंगले आणि या सामन्यांमधून केवळ प्रचंड प्रेक्षक आणि नफा मिळाला नाही, तर उपखंडामध्ये टी-२० क्रिकेटची क्रेझही प्रचंड वाढली. याच माध्यमातून पुढे आयपीएल आणि इतर टी-२० लीग सुरु झाले.
आज रंगणार क्रिकेटचा ‘ब्लॉकबस्टर’, भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता शिगेला
यंदाची सहा संघांचा समावेश असलेली आशिया चषक नक्कीच १६ संघांच्या समावेशाने रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भव्यदिव्य नसणार. पण असे असले तरी भारत-पाकिस्तान सामन्यातील थरार किंचितही कमी झालेला नसणार. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा रविवारच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्याकडे खिळल्या आहेत. दोन्ही संघ गोलंदाजीच्या दृष्टीने कमजोर भासत आहेत; कारण दोन्ही संघांचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. भारतीय संघ प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टी-२० स्पेशालिस्ट हर्षल पटेल यांच्याविना खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याविना खेळणार असून वेगवान गोलंदाज मोहम्मद वसिमदेखील दुखापतग्रस्त झाला आहे. फिरकीमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ दिसत असून हार्दिक पांड्याच्या रूपाने भारताला मोठा फायदा होईल. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असल्यानेच भारताचे पारडे काहीसे वरचढ दिसत आहे.