Priyanka Gandhi : "भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात महिला सुरक्षित नाहीत"; प्रियंका गांधींनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 04:41 PM2023-09-28T16:41:52+5:302023-09-28T16:54:24+5:30
Congress Priyanka Gandhi : एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात मुली, महिला, आदिवासी सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला. उज्जैन शहरातील रस्त्यावर रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत 12 वर्षांची मुलगी सोमवारी आढळली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. "भगवान महाकाल यांच्या उज्जैन नगरीमध्ये एका लहान मुलीवर झालेला क्रूरपणा मन हेलावून टाकणारा आहे. अत्याचारानंतर ती अडीच तास मदतीसाठी दारदारी भटकत राहिली आणि नंतर रस्त्यावर बेशुद्ध पडली मात्र मदत मिळू शकली नाही."
भगवान महाकाल की नगरी उज्जैन में एक छोटी बच्ची के साथ हुई बर्बरता आत्मा को झकझोर देने वाली है। अत्याचार के बाद वह ढाई घंटे तक दर-दर मदद के लिए भटकती रही और फिर बेहोश होकर सड़क पर गिर गई लेकिन मदद नहीं मिल सकी।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 28, 2023
ये है मध्य प्रदेश की कानून व्यवस्था और महिला सुरक्षा? भाजपा के 20 साल…
"ही मध्य प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा? भाजपाच्या 20 वर्षांच्या कारभारात भारतातील महिला, आदिवासी आणि दलित सुरक्षित नाहीत. महिलांना संरक्षण आणि मदत मिळत नसेल, तर बहिणीच्या नावावर निवडणुकांमध्ये घोषणा जाहीर करून काय उपयोग?" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी देखील उज्जैन घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. उज्जैन शहरात बलात्कार झालेल्या 12 वर्षीय मुलीवर इंदूरच्या सरकारी रुग्णालयात बुधवारी तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र त्यानंतरही तिची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला उज्जैन येथून गंभीर अवस्थेत मंगळवारी इंदूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.