नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत जनतेने आम्हाला विजयी केले तर दिल्ली शहरातील नागरिकांना ५०० रुपयांमध्ये सीएनजी सिलिंडर देण्याची तसेच रेशन कीट व ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन काँग्रेसने गुरुवारी दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव उपस्थित होते.
ए. रेवंथ रेड्डी म्हणाले की, काँग्रेसने दिलेल्या पाच हमी दिल्लीत सत्तेत आल्यानंतर नक्की पूर्ण करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल या दोघांनीही दिल्लीच्या विकासासाठी काहीही काम केलेले नाही. काँग्रेसने प्यारी दीदी योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला २५०० रुपयांची मदत, जीवन रक्षण योजनेद्वारे नागरिकांना २५ लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभराच्या काळात दरमहा ८५०० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, असे रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.
स्मृती इराणी यांना भाजपने मैदानात उतरविलेच नाहीमाजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेला गुरुवारी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर करताच पूर्णविराम मिळाला. भाजपने युती धर्माचे पालन करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. पक्षाने ६८ जागांवर उमेदवार दिले असून, जनता दल युनायटेड व लोकजन शक्ती पक्षाला प्रत्येकी एक जागा दिली आहे.
एआयचा जबाबदारीने वापर व्हावा : निवडणूक आयोगनिवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वाढता वापर व मतदारांना प्रभावित करण्याची तंत्रज्ञानाची क्षमता या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी दिशानिर्देश जारी केले.एआयपासून तयार केलेल्या सामग्रीचा वापर करताना पारदर्शकतेचे व जबाबदारीचे भान ठेवण्याचे निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले आहेत. प्रचार जाहिराती किंवा सामग्रीचा प्रसार करताना अस्वीकरणाचा (डिस्क्लेमर) देखील समावेश करावा लागणार असल्याचे आयोगाच्या दिशानिर्देशात म्हटले आहे.
केंद्राने माफी मागावीदिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्याबद्दल केंद्र सरकारने माफी मागावी, अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. केजरीवाल व आपच्या अन्य काही नेत्यांना अवैध पद्धतीने अटक केली होती, असे ते म्हणाले.