काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 12:18 AM2019-10-11T00:18:16+5:302019-10-11T00:23:08+5:30
येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडालेला असताना काँग्रेस पक्षाच्या एकाही राष्ट्रीय नेत्याची महाराष्ट्रात अद्याप जाहीरसभा झालेली नाही. यामुळे या राष्ट्रीय नेत्यांची ‘पायधूळ’ महाराष्ट्राच्या भूमीला केव्हा लागणार, असा संतप्त सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते करू लागले आहेत.
येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र ढवळून काढत असताना काँग्रेसचे ‘रार्ष्ट्रीय’ नेते अद्यापही प्रचारासाठी उतरलेले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात उतरलेले असताना काँग्रेसचे मैदान मात्र सुनसान आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मतदारसंघात अडकून पडलेले आहेत. काँग्रेसने ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे निवडणूक समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. यापैकी एकाही नेत्यांची ‘पायधूळ’ अद्यापही महाराष्ट्राच्या भूमीला लागलेली नाही.
गांधी परिवारावर मदार
काँग्रेसची सारी मदार गांधी परिवारावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी या तिन्ही नेत्यांच्या येत्या १३ आॅक्टोबरपासून जाहीरसभा महाराष्ट्रात होणार आहेत. यात प्रियंका गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये उतरणार असल्याने अनेक उमेदवारांनी प्रियंका गांधी यांच्या जाहीरसभांची मागणी केली आहे. परंतु अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.