Congress Protest: महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. राजधानी दिल्लीतही कांग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. यादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रियंका गांधींना ताब्यात घेताना पोलिसांसोबत झटापट झाली. दरम्यान, प्रियांका गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हात मुरगळताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये प्रियांका गांधी प्रचंड संतापलेल्या दिसत असून, त्या ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिसाचा हात मुरगळताना दिसत आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रियांका वाड्रांनी ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला मारहाण केली. त्यांनी महिलेचा हात पकडून मुरगळला. नंतर हेच पोलिस दमदाटी करत असल्याचा आरोप करतात,' असे त्यांनी लिहीले.
या फोटोवर विविध कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मॅडम तुम्ही ज्यांचा हात फिरवत आहात, ती महिला देशाची मुलगी आहे. परीक्षा पास होऊन पोलिस सेवेत रुजू झालेली आहे. तिचे वडील, आई, भाऊ आणि पतीने कोणतीही चोरी केली नाही.' दुसऱ्या एका युजरने कमेंट करत प्रियंका गांधींवर टीका केली. तर, काही यूजर्स प्रियांका गांधींना सपोर्ट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'त्या गांधी आहेत, दडपशाहीविरोधात उभे राहणे हा त्यांचा इतिहास आहे.' दुसऱ्या एका यूजरने लिहीले की, 'फोटोमध्ये पोलीस कुठे आहेत? फेक न्यूज पसरवली जात आहे.'