Congress: काँग्रेसच्या निवडणुकीची मतदारयादी प्रसिद्ध करा, शशी थरूर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:20 AM2022-09-03T06:20:20+5:302022-09-03T06:20:57+5:30
Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्षपद निवडणुकीची मतदारयादी प्रकाशित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. आसामचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनीही मिस्त्री यांना पत्र पाठवून मतदारयादी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मतदार यादीच्या मुद्द्यावर पक्षात घमासान चर्चा सुरू असताना आणि यादी जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर असताना या
दोघांनी याबाबत प्रमुखांना पत्र लिहिले आहे हे विशेष. निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेत १० सूचकांचा समावेश आहे. हे सूचक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रतिनिधी असतील. त्यांची नावे समजणे आवश्यक आहे. कारण, त्यांचे नाव अंतिम यादीत न आल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो, असे थरूर म्हणाले.
‘गांधी’वगळून अध्यक्ष निवडावा- प्रकाश आंबेडकर
काँग्रेसने गांधी परिवाराचा सदस्य वगळून अध्यक्ष निवडावा व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जनमानस बदलण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना भारत जोडो करण्याची आवश्यकता आहे की, काँग्रेसमधील फूट रोखण्याची आवश्यकता आहे यावर विचार व्हावा, असे आंबेडकर म्हणाले.