- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाजप नसून काँग्रेसचेच काही नेते आहेत व त्यांनी मतदारांच्या यादीची मागणी केलेली आहे.आनंद शर्मा यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मतदारयादी मागितली व त्याच बैठकीत निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लोकसभा सदस्य मनीष तिवारी व कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना मतदारांची यादी शेअर करावी, असे म्हटले आहे.मिस्त्री यांनी म्हटले आहे की, ज्यांना यादी पाहिजे त्यांनी प्रदेश काँग्रेस समितीशी संपर्क साधावा. कार्यालयांमध्ये यादी मिळेल. यावर मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मतदारांची यादी मिळत नाही, तोपर्यंत कोणीही निवडणूक लढण्याची तयारी कशी करू शकतो.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हमनीष तिवारी यांच्यानंतर कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले आहेत व मतदारयादी जाहीर करण्याची मागणी केली. आनंद शर्मा व मनीष तिवारी हे दोघेही नाराज गटातील आहेत. यावरून एक स्पष्ट आहे की, गांधी कुटुंबातील कोणी उमेदवार असला किंवा त्यांच्या सहमतीने दुसरा कोणी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार असला तरी यावेळी निवडणूक होणार आहे व ती चुरशीची लढत असेल.