नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,15,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 630 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,177 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत असताना कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनावरील लस सर्व वयोगटातील नागरिकांना सध्या तरी दिली जाऊ शकत नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. कोरोना लसीकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. "गरज आणि मागणी यावर वाद घालणं हास्यास्पद आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे" असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बापरे! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह; परिस्थिती गंभीर
कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कुटुंबीयांपासून दूर राहून ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र याच दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा तर मृत्यू देखील झाला आहे. कोरोनाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. लखनऊमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत सहा हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटी (KGMU) चे कुलपती डॉ विपिन पुरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच केजीएमयूचे डॉ. हिमांशु यांच्यासह 40 डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे. केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. "देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगड आणि दिल्लीतील एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे" अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे. "पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचं प्रमाण 34 टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत." "आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त 60 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या 70 टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे" असं देखील भूषण यांनी सांगितलं आहे.