Rahul Gandhi in Amethi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी वाड्रा शनिवारी अमेठीत उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदुत्वच्या मुद्द्यावर भाष्य केलं. हिंदूचा रस्ता सत्याग्रहाचा आहे, तर हिंदुत्ववादीचा रस्ता सत्ताग्रहाचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच जो अन्यायाविरोधात लढतो तो हिंदू आणि जो हिंसा पसरवतो तो हिंदुत्त्ववादी असतो असंही ते म्हणाले.
आज एका बाजूला हिंदू आहेत की जे सत्याची कास धरुन आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत की जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि असे लोक सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या लोकांना आज हिंदुस्थानात हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी यांच्या लढाई निर्माण केली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं आणले आहेत असं आधी सांगितलं गेलं आणि वर्षभरानं आज सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. सरकारनं आजवर जे काही कायदे आणले मग ते नोटाबंदी असो किंवा मग जीएसटी यातून कोणताही फायदा सामान्यांना झालेला नाही. मग हे कायदे काही मोजक्या उद्योगपतींसाठी आणले होते का? असा सवाल आम्ही उपस्थित करत आलो आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले.
चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाऐवढी जमीन बळकावलीलडाखमध्ये चीननं दिल्लीच्या क्षेत्राफळाएवढी भारताच्या अधिपत्याखालील जमीन बळकावली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीननं भारताची जमीन बळकावली पण मोदींनी काहीच केलं नाही किंवा काही बोलले सुद्धा नाहीत. जेव्हा त्यांना याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी चीननं अशी कोणतीच जमीन बळकावली नसल्याचं म्हटलं. पण संरक्षण मंत्रालयानं चीननं जमीन बळकावली असल्याचं मान्य केलं, असं राहुल गांधी म्हणाले.
बेरोजगारी आणि महागाईवर पंतप्रधान गप्प का?देशात आज बेरोजगारी आणि महागाई हेच दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आज गप्प का? सरकार आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही. नुकतंच मोदी एकटे गंगास्नान करुन आले. पण देशातील तरुणांना रोजगार कसा देणार हे काही ते आजवर सांगू शकलेले नाहीत. देशातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? महागाई इतक्या वेगानं का वाढते आहे? याची उत्तरं पंतप्रधानांकडे नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.